दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शतकामुळे त्याने आपल्या खात्यात गुणांची भर घालताना अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. दरम्यान रवींद्र जडेजानेही पहिले शतक झळकावताना अष्टपैलू खेळाडूंच्या अव्वल स्थानाच्या दिशेने कूच केली आहे. तो या क्रमवारीत तीन गुणांच्या फरकाने दुसऱ्या स्थनावार आहे. भारताचे दोन गोलंदाज आणि दोन फलंदाज अव्वल दहा खेळाडूंमध्ये आहेत.
विराटने राजकोट कसोटीत 139 धावांची खेळी केली होती आणि तो आता 936 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. विराटने इंग्लंड दौऱ्यातही धावांचा ओघ कायम राखला होता. ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ ( 919) आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( 847) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल दहा फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजाने 417 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. राजकोट कसोटीत त्याने शतकी खेळी आणि चार विकेट्स घेतल्या होत्या. या क्रमवारीत बांगलादेशचा शकीब अल हसह (420) अव्वल स्थानावर आहे. कुलदीप यादवनेही राजकोट कसोटीत एकूण सहा विकेट घेतल्या. या कामगिरीसह तो 52 व्या स्थानावर पोहोचला आहे. अव्वल दहा गोलंदाजांमध्ये जडेजा ( 818) आणि आर अश्विन ( 779) अनुक्रमे चौथ्या व आठव्या स्थानावर आहे.