बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिके आधी भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आयसीसी कसोटी क्रमवारीत आघाडीच्या पाचमध्ये पोहचला आहे. इंग्लंडचा बॅटर जो रुट अव्वलस्थानी कायम आहे. पण लंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात धावा न केल्यामुळे त्याच्या रेटिंगवर परिणाम झाल्याचे दिसून येते. या दोघांशिवाय श्रीलंकेच्या फलंदाजालाही मोठा फायदा झाल्याचे दिसते.
तीन वर्षांनी रोहितची पुन्हा टॉप ५ मध्ये एन्ट्री
बुधवारी आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत रोहित शर्मानं आघाडीच्या पाचमध्ये एन्ट्री मारली आहे. सप्टेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच तो टॉप ५ मध्ये परतला आहे. भारतीय कॅप्टन ७५१ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. बॅटर विराट कोहली आणि युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ही भारतीय जोडी टॉप १० मध्ये असल्याचे दिसते. रोहितच्या पाठोपाठ या यादीत यशस्वी जैस्वालचा नंबर लागतो. तो ७४० रेटिंगसह सहाव्या तर विराट कोहली ७३७ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या या तिंघांना क्रमवारीत आणखी सुधारणा करण्याची मोठी संधी असेल.
लंकेच्या या खेळाडूंचा दिसतो डंका
श्रीलंकेच्या संघाने सोमवारी लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडला शह दिला होता. श्रीलंकेच्या संघाने जवळपास १० वर्षांनी कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. कॅप्टन धनंजया डी सिल्वा, मध्यफळीतील फलंदाज कामिंडु मेंडिस आणि सलामी फलंदाज पथुम निसंका यांनी इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली. इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील ६९ धावांच्या खेळीसह डी. सिल्वानं कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ रँकिंग मिळवली आहे. तो १३ व्या स्थानावर पोहचला आहे. निसंका याने ४२ स्थानांनी झेप घेत ३९ व्या क्रमांकावर पोहचला आहे.
जो रुटचं अव्वलस्थान कायम, पण रेटिंगमध्ये घसरण
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट हा श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याआधी ९२२ रेटिंगसह अव्वल स्थानावर होता. त्याला आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगकडे आगेकूच करण्याची संधी होती. पण तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यामुळे त्याचे रेटिंग घसरले आहेत. तो टॉपला असला तरी त्याचे रेटिंग ८९९ इतके आहे.
Web Title: ICC Test Rankings 2024 Rohit Sharma Reclaims Top 5 Sri Lankan Cricketers Achieve Career Best Positions Joe Root On Top
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.