Jasprit Bumrah R Ashwin, ICC test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी कसोटी क्रिकेट क्रमवारी जाहीर केली असून त्यात भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अव्वलस्थान पटकावले आहे. त्याने महान फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याची जागा घेतली. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने शानदार गोलंदाजी केली होती, पण बुमराहचा मारा अधिक प्रभावी ठरलाय त्यामुळेच बुमराहने ताज्या ICC कसोटी क्रमवारीत अश्विनला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.
कानपूर कसोटीत सहा विकेट्स घेत बुमराहने अव्वलस्थानी पोहोचण्याचा पराक्रम केला. रविचंद्रन अश्विनला मागे टाकून त्याने दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले. आता बुमराहचे ८७० रेटिंग पॉइंट्स असून तो अश्विनपेक्षा केवळ एका गुणाने पुढे आहे. यादीत टॉप-१० मध्ये रवींद्र जाडेजा ८०९ रेटिंग पॉईंस्टसह सहाव्या स्थानी आहे. बांगलादेशचा मेहदी हसन मिराज चार स्थानांच्या बढतीसह १८व्या स्थानी पोहोचला आहे. (पाहा क्रमवारी)
जैस्वाल, विराटला क्रमवारीत बढती
फलंदाजांच्या यादीत भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने दमदार कामगिरी केली आहे. तो २ स्थानांच्या बढतीसह तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याच्या खात्यात आता ७९२ रेटिंग पॉइंट्स आहेत. भारताचा रनमशिन विराट कोहली तब्बल ६ स्थानांची उडी घेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तो बरेच महिन्यांनी टॉप-१० मध्ये आला आहे. विराटचे सध्या ७२४ रेटिंग पॉइंट्स आहेत.
रोहित, पंत, गिलची घसरण
भारताचा कर्णधार रोहित शर्माची या यादीत ५ स्थानांनी घसरण झाली आहे. तो टॉप १० मधून बाहेर पडून १५व्या स्थानी पोहोचला आहे. शुबमन गिलदेखील २ स्थान खाली घसरून १६व्या स्थानी आला आहे. सध्या रोहितचे ६९३ तर गिलचे ६८४ रेटिंग पॉइंट्स आहेत. रिषभ पंतदेखील ताज्या क्रमवारीत ३ स्थानांच्या घसरणीसह नवव्या स्थानी आला आहे. (पाहा क्रमवारी)
अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये भारताचे वर्चस्व कायम
ताज्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जाडेजा ४६८ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी तर रवीचंद्रन अश्विन ३५८ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी कायम आहे. बांगलादेशचा शाकीब अल हसन २८५ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी कायम आहे. बांगलादेश मालिकेचा भाग नसलेल्या अक्षर पटेलची एका स्थानाने घसरण झाल्याने २५९ गुणांसह सातव्या स्थानी आहे. (पाहा क्रमवारी)