आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत विकेट किपर बॅटर रिषभ पंतनं किंग कोहलीला मागे टाकले आहे. कसोटी क्रमवारीत पंतनं ३ स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर कब्जा केला आहे. त्याच्या खात्यात ७४५ रेटिंग पाँइंट्स आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात २० तर दुसऱ्या डावात ९९ धावांची खेळी केली होती. या दमदार खेळीचा त्याला क्रमवारीत फायदा झाल्याचे दिसून येते.
विराट क्रमवारीत घसरला
विराट कोहलीनं न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटीत ७० धावांची खेळी केली होती. अर्धशतक झळकावूनही त्याच्या क्रमवारीत घसण झाली आहे. ७२० रेटिंग पाइंट्ससह तो सातव्या क्रमांकावर आता आठव्या स्थानावर घसरलाय. कसोटी क्रमावारीत पंत आणि विराटशिवाय यशस्वी जैस्वाल टॉप १० मध्ये आहे. तो ७८० रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे.
फिफ्टी करून रोहित शर्माही घाट्यात
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दमदार अर्धशतक झळकावले होते. तरीही त्याला मोठा फटका बसला आहे. क्रमवारीत तो १३ व्या स्थानावरुन १५ स्थानी घसरलाय. सध्याच्या घडीला रोहितच्या खात्यात ६८३ रेटिंग पाइंट्स जमा आहेत.
फलंदाजीत जो रूट अव्वलस्थानी कायम, पण...
इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानावर आहे. पण त्याच्या रेटिंग पाँइंट्समध्ये घसरण झाली आहे. त्याच्या खात्यात ९१७ रेटिंग पाइंट्स आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला अपयश आले होते. पहिल्या डावात२४ तर दुसऱ्या डावात त्याला फक्त १३ धावा करता आल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन (८२१ रेटिंग पॉइंट्स) तर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा हॅरी ब्रूक(८०३) चा नंबर लागतो.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अन् अश्विनचा जलवा कायम
बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणाऱ्या कुलदीप यादवनं न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीसह त्याने क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा केली आहे. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना बंगळुरु कसोटीत चमकदार कामगिरी करता आली नव्हती. पण त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या क्रमवारीवर झालेला नाही. बुमराह ८७१ रेटिंग पॉइंट्सह पहिल्या तर आर अश्विन ८४९ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.