भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli ) याने नव्या वर्षात आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. विराटने पाकिस्तानचा माजी कर्णधार व फलंदाज बाबर आजम याला मागे टाकले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही फलंदाजाच्या क्रमवारीत टॉप १० मध्ये एन्ट्री घेतली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताने कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. त्यात रोहित व विराट यांनी चांगली कामगिरी केली आहे. तेच दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सपशेल अपयशी ठरलेल्या बाबरची क्रमवारीत घसरण झाली आहे.
आफ्रिका दौऱ्यावर दमदार कामगिरी करणारा विराट दोन स्थानांच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर आला आहे. धावा काढण्याची त्याची भूक अजूनही कायम आहे आणि तो कोणत्याही आव्हानात्मक खेळपट्टीवर धावा करतोय. रोहितनेही सातात्यपूर्ण कामगिरी करताना टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय ट्रॅव्हिस हेड व सौद शकील यांनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे. बाबरची ८व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशे व पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
गोलंदाजी विभागात भारताचा मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांना आफ्रिका दौऱ्यातील उल्लेखनीय कामगिरीचा फायदा झाला आहे. सिराज १३ स्थानांच्या सुधारणेसह १७व्या क्रमांकावर, तर बुमराह चौथ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, त्याने आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकले. भारताचा आऱ अश्विन अव्वल स्थानावर आहे, तर रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे.