Virat Kohli Rohit Sharma, ICC Test Rankings : भारतात IPLची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तान वगळता इतर बऱ्याच संघाचे खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. याचदरम्यान, कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, या क्रमवारीत भारताचे पाच खेळाडू Top 10 मध्ये विराजमान आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह या पाच खेळाडूंनी Top 10 मध्ये आपले स्थान कायम ठेवलं आहे.
कसोटी क्रमवारीत कॅप्टन रोहित शर्मा आठव्या स्थानी आहे. तर विराट कोहली १०व्या क्रमांकावर कायम आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी कायम आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजाने अव्वल स्थान कायम राखले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत बांगलादेशचा लिटन दास आणि श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांना फायदा झाला आहे. लिटन दास १७ व्या तर मॅथ्यूज २१ व्या स्थानी विराजमान झाला आहे. या दोघांनी पहिल्या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी केली होती.
फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ८९२ गुणांसह अव्वल आहे. तर स्टीव्ह स्मिथ ८४५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत केन विल्यमसन ८४४ गुणांसह तिसर्या, जो रुट ८४३ गुणांसह चौथ्या आणि बाबर आझम ८१५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा रोहित शर्मा ७५४ गुणांसह आठव्या तर विराट कोहली ७४२ गुणांसह दहाव्या स्थानी आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स ९०१ गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताचा आर अश्विन ८५० गुणांसह दुसऱ्या तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ८३० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदीने यादीत ८२७ गुणांसह चौथे आणि न्यूझीलंडच्या कायल जेमिसन ८२० गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे.
Web Title: ICC Test Rankings Virat Kohli Rohit Sharma Jasprit Bumrah total 5 Indians in Top 10 in List
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.