Join us  

आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? आजपासून रंगणार डब्ल्यूटीसी फायनल 

भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान परतविण्याचे लक्ष्य; १४३ वर्षांच्या इतिहासात द ओव्हलवर पहिल्यांदा जूनमध्ये कसोटीचे आयोजन होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 8:17 AM

Open in App

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

लंडन : कौशल्य आणि विजयाची भूक जोपासणारा भारतीय संघ बुधवारपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत लंडनच्या द ओव्हलवर दोन हात करणार आहे. हा सामना जिंकून भारताला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची संधी असेल.  मात्र, इंग्लंडमधील हवामानात ऑस्ट्रेलियाला हरविणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही. 

याआधी २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात  न्यूझीलंडविरुद्ध आठ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. डब्ल्यूटीसीच्या दोन टप्प्यांत भारत सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ ठरला. दहा वर्षांत पांढऱ्या चेंडूंच्या सर्वच स्पर्धेत संघाने बाद फेरी गाठली, तरीही जेतेपदापासून दूर राहिला. २०१३ ला भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडिया तीन वेळा फायनल तर चार वेळा उपांत्य सामन्यात पराभूत झाला. २०२१ ला   टी-२० विश्वचषकात भारत पहिल्याच फेरीत बाहेर पडला होता. दोन वर्षांच्या कसोटी मालिकांमध्ये सहापैकी केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने नेतृत्व सोडले होते. तेव्हापासून रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करीत आहे.

भारत मायदेशात अपराजित राहिला. इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत सोडविली. बांगलादेशमध्ये कठीण विजय मिळविला. ऑस्ट्रेलियावर तर ‘होम आणि अवे’ असे दोन्ही वेळा विजय नोंदविले.  दोन वर्षांआधी न्यूझीलंडविरुद्ध परिस्थितीचा अभ्यास न करता दोन फिरकीपटू खेळविणे अंगलट आले होते. या चुकीची पुनरावृत्ती टाळावी लागेल.

वेगवान माऱ्याचे आव्हान

हा सामना दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजांसाठी ‘वर्चस्वाची लढाई’ असेल. भारतीय फलंदाजांना पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलॅन्ड यांचा सामना करणे सोपे नाही. यानिमित्त अनुभवी रोहित, विराट आणि युवा शुभमन गिल यांची परीक्षा असेल. चेतेश्वर पुजाराचा कौंटीतील अनुभव, अजिंक्य रहाणेचे पुनरागमन संघासाठी किती लाभदायी ठरेल, याकडे लक्ष आहे. ऑस्ट्रेलियाला अधिक सरावाची संधी मिळालेली नाही. त्यांचे तीन खेळाडू आयपीएल खेळले तर मार्नस लाबुशेन आणि  स्टीव्ह स्मिथ कौंटीत खेळत होते. त्यांना उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल. स्मिथची येथे धावांची सरासरी शंभर अशी असून ऑफ स्पिनर लाथन लियोन फलंदाजांना त्रस्त करू शकतो. अष्टपैलू म्हणून कॅमेरून ग्रीन मोठी भूमिका बजावेल.

ढगाळ वातावरणात नाणेफेक महत्त्वाची

वातावरण ढगाळ असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण पसंत करेल, असे वाटते. सुरुवातीला दोन तासांच्या खेळात किती फलंदाज बाद होतात, यावर संघाची पुढील वाटचाल ठरणार आहे. थंडी असल्याने फलंदाजी करणे सोपे जाणार नाही. प्रत्येक सत्र महत्त्वाचे असेल. आधी फलंदाजी केली आणि तीन-चार गडी गमावले तर दोन्ही संघांसाठी पुनरागमन करणे कठीण होऊ शकते. तरीही भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड वाटते. भारताने दोन फिरकीपटू खेळविण्याऐवजी एक अतिरिक्त फलंदाज खेळविणे लाभदायी ठरेल. सामना जिंकण्यासाठी मानसिक कणखरतादेखील निर्णायक ठरेल.

आकडे काय सांगतात?

ओव्हलवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे वर्चस्व राहिले. येथे १०४ कसोटी सामने खेळले गेले. त्यातील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३७ सामने जिंकले.  दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने २९ कसोटी सामन्यात विजय मिळविला आहे. ३७ सामने अनिर्णित राहिले. नाणेफेक जिंकणारा संघ ३६ वेळा तर नाणेफेक हरणारा संघ ३० वेळा जिंकला.

ओव्हलवर झालेल्या शेवटच्या कसोटीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना दोन्ही डावांत २०० धावांचा आकडा पार करता आलेला नव्हता. त्यामुळे  जो संघ खेळपट्टीवर जास्त काळ टिकाव धरेल त्याला सामन्यावर पकड निर्माण करण्याची संधी असेल.

खेळपट्टीचे स्वरूप हे ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखेच असले तरी सामना ड्यूक चेंडूवर होणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरू शकेल.

अष्टपैलू खेळाडूचीदेखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. एखाद्या संघाची फलंदाजी ढेपाळू शकते किंवा प्रमुख गोलंदाज निष्प्रभ ठरू शकतात. अशावेळी अष्टपैलू खेळाडू चांगल्या कामगिरीच्या बळावर विजय मिळवून देऊ शकतील.

स्थळः द ओव्हल

वेळः दुपारी ३ वाजेपासून

थेट प्रक्षेपणः स्टार स्पोर्ट्स, डिझनी हॉटस्टार

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App