दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ही मालिका 1-0 अशी जिंकली. उभय संघांमध्ये आजपासून तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच पाकिस्तानचा विजयरथ अडवण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेच्या चषक अनावरणाचा सोहळा बुधवारी पार पडला, परंतु चषकाच्या रुपरेषेवरून पाकिस्तान संघ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.
ट्वेंटी-20 सामन्यांच्या या मालिकेचे 'बिस्कीट ट्रॉफी' असे नाव आहे, हो तुम्ही बरोबर ऐकत आहात. या मालिकेतील विजयी संघाला TUC Cup देण्यात येणार आहे. TUC ही पाकिस्तानमधील बिस्कीट उत्पादन करणारी कंपनी आहे आणि या मालिकेचे ते मुख्य प्रायोजक आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( पीसीबी) बिस्कीटाच्या आकाराची ट्रॉफी बनवण्याचा निर्णय घेतला.
या ट्रॉफीची डिझाईन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) या ट्रॉफीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची फिरकी घेतली आहे.