माऊंट माऊंगानुह : भारतीय क्रिकेटचे भावी स्टार्स आयसीसी वन डे अंडर 19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या भारतीय संघाने कर्णधार पृथ्वी शॉ (94) मनजोत कालरा (86) आणि शुभम गिल (63) यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कांगारूंना 329 धावांचं कठीण लक्ष्य दिलं आहे. या तिघांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्दारीत 50 षटकात 7 गडी बाद 328 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एड्वर्डने सर्वाधिक 9 षटकांमध्ये 65 धावा देऊन 4 विकेट घेतल्या.
भारताला कर्णधार पृथ्वी शॉच्या रूपात पहिला धक्का बसला. त्याचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. विल सदरलॅंडच्या गोलंदाजीवर बक्सटरकडे झेल देऊन तो बाद झाला. पृथ्वीने 100 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकार फटकावले. मनजोत आणि पृथ्वी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 180 धावांची भागिदारी केली. या जोडीने रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन या जोडीचा 175 धावंच्या भागीदारीचा विक्रम मोडला. मनजोत कालराने पृथ्वीला सुरेख साथ देताना 99 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकारासह 86 धावा केल्या. पण पृथ्वी बाद होताच कालरानेही विकेट सोडली. पृथ्वीच्या जागी फलंदाजीसाठी आलेल्या शुभम गिल यानेही झटपट अर्धशतकी खेळी केली. 54 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 1 षटकार ठोकत त्याने 63 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा (23), हिमांशु राणा (14) आणि अंकुल सुधाकर रॉय (6) यांच्या विकेट लवकर गेल्या.
‘गुरू’राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंचा संघात समावेश आहे. भारतीय संघ अनेक दिवसांआधी येथे दाखल झाल्यामुळे येथील हवामानाशी एकरूप झाला आहे.
भारताने तीन वेळा विजेतेपदाचा मान मिळविला. याआधी २०१४ मध्ये भारत विश्वविजेता बनला होता. या संघातील कुण्या एका खेळाडूच्या तयारीवर द्रविड यांचे लक्ष नव्हते. त्यांनी सांघिक कामगिरीवर भर दिला आहे. तरीही पृथ्वी शॉ हाच फलंदाजीचा आधारस्तंभ असेल. हिमांशु राणा, पंजाबचा शुभमान गिल, अनुकूल रॉय आणि अभिषेक शर्मा हे धावसंख्येला आकार देण्यात सक्षम मानले जातात. बंगालचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेल याच्यावर विशेष लक्ष असेल. त्याला शिवम मावी साथ देणार आहे.
शॉ संघाच्या तयारीवर आनंदी आहे. गेल्या आठवड्यात भारताने येथे काही सराव सामने खेळले.
Web Title: ICC U-19 World Cup 2018: first match against australia, Prithvi Shaw looks to lead by example with extraordinary performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.