नवी दिल्ली - अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. मंगळवारी ग्रुप बी मधील दुस-या सामन्यात बलाढय भारताने नवख्या पापुआ न्यू गिनिया संघावर दहा विकेटने दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पृथ्वी शॉ चा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
भारताच्या भेदक मा-यासमोर पापुआ न्यू गिनियाचा संघ अवघ्या 64 धावात गारद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज अनुकूल रॉयने अवघ्या 14 धावात गिनियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. भारताने गिनियाचे 65 धावांचे माफक आव्हान अवघ्या आठ षटकात पार केले.
कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोत कालराने कुठलीही पडझड होऊ न देता आरामात विजय मिळवला. पृथ्वी शॉ ने 36 चेंडूत नाबाद 57 धावा तडकावल्या यात 12 चौकारांचा समावेश होता. कालराने नाबाद 9 धावा केल्या. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने बलाढय ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.