ख्राईस्टचर्च - पाकिस्तानचा तब्बल 203 धावांनी पराभव करुन भारताने दिमाखात अंडर -19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या या विजयात शुभमन गिल बरोबर इशान पोरेलने मोलाची भूमिका बजावली. शुभमनच्या 102 धावांच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताने 272 धावांचा टप्पा गाठल्यानंतर इशान पोरेलने भेदक मारा करत पाकिस्तानचे कबंरडे मोडून टाकले. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने 6 षटकात 17 धावांच्या मोबदल्यात चार विकेट काढल्या.
इशानच्या सहामधली दोन षटके मेडन होती. इशानने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवारांना स्वस्तात माघारी धाडले. मोहम्मद झायेद आलम (7) त्याची पहिली शिकार ठरला. पोरेलने त्याला शिवम मावीकरवी झेलबाद केले.
त्यानंतर लगेचच इमरान शहाला (2) धावांवर पृथ्वी शॉ कडे झेल द्यायला भाग पाडले. अली असीफला (1) रन्सवर तर अम्माद आलमला (4) धावांवर बाद केले. त्याने पाकिस्तानची आघाडीची फळी कापून काढली. सुरुवातीच्या झटक्यानंतर पाकिस्तान शेवटपर्यंत सावरलाच नाही आणि अवघ्या 69 धावात पाकिस्तानचा डाव आटोपला. इशान मूळचा पश्चिम बंगालचा आहे. त्याने प्रथमश्रेणीच्या तीन सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत.
वर्ल्ड कप एका पावलावरअंडर 19 वर्ल्डकपमधील आपली विजयी घोडदौड भारतीय संघाने कायम ठेवली असून क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. भारताने पाकिस्ताननचा तब्बल 203 धावांनी पराभव करत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जिंकण्याची पुरेपूर संधी संघाकडे आहे. शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र फक्त 69 धावांतच गारद झाला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांत 9 बाद 272 धावा फटकावल्या. शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद आणि कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांच्यातील दणदणीत सलामी भागीदारी हे भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. पृथ्वी शॉ आणि कालरा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेणाऱ्या शुभमनने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. डावातील शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण करणाऱ्या गिलने 94 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या.