ICC U-19 World Cup 2022 team of the tournament: भारताच्या १९ वर्षांखालील संघाने रविवारी इंग्लंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंडचे १९० धावांचे लक्ष्य भारताने १४ चेंडू राखून पार केले आणि भारताला पाचव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून दिला. राज बावाने ५ विकेट्स घेताना ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रवी कुमारने ४ विकेट्स घेतल्या, तर उप कर्णधार शेख राशिद आणि निशांत सिंधू यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाचा विजय पक्का केला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आयसीसीनेही भारताचा कर्णधार यश धुल ( Yash Dhull) याचा अनोखा गौरव केला.
आयसीसीनं जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी यश धुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक ५०६ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवॉल्ड ब्रेव्हिस याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. त्याचाही या संघात समावेश केला गेला आहे.
या स्पर्धेत यश धुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका शतकासह २२९ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या टॉम प्रेस्टच्या नावावर सहा सामन्यांत २९२ धावा आहेत. ब्रेव्हिस हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात ५००+ धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला. पाकिस्तानच्या हसीबुल्लाह खानने ३८० धावा केल्या आहेत. त्याने दोन शतकं झळकावली आहेत.
आयसीसीने जाहीर केलेला संघ - हसीबुल्लाह खान ( यष्टिरक्षक, पाकिस्तान), टिएग्यू विली ( ऑस्ट्रेलिया), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( दक्षिण आफ्रिका), यश धुल ( कर्णधार, भारत), टॉम प्रेस्ट ( इंग्लंड), दुनिथ वेलालागे ( श्रीलंका), राज बावा ( भारत), विकी ओस्तवाल ( भारत), रिपोन मोंडल ( बांगलादेश), अवैस अली ( पाकिस्तान), जॉश बॉयडेन ( इंग्लंड), १२ वा खेळाडू- नूर अहमद ( अफगाणिस्तान).