भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक लगावून आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या सुपर सिक्समध्ये स्थान पक्के केले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्ताननेही आपल्या ड गटात विजयाची हॅटट्रिक केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान एकाच गट-१ मध्ये आहेत. मात्र, या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. ३० जानेवारीपासून सुपर सिक्स फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत.
भारताच्या अंडर-१९ संघाने रविवारी अ गटात अमेरिकेचा २०१ धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयात शतकवीर अर्शिल कुलकर्णीची (१०८) मोठी भूमिका राहिली. तर मुशीर खानने ७३ धावांची खेळी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२६ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघ केवळ १२५ धावांत आटोपला. या आधीच्या सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने आयर्लंडचा २०१ धावांनी धुव्वा उडवला होता. भारताने बांगलादेशवर ८४ धावांनी विजय मिळवला होता.
IND आणि PAK एकाच गटातअंडर-१९ विश्वचषकाच्या सुपर सिक्समध्ये भारताच्या अ गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, आयरर्लंड आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघाला सुपर सिक्समध्ये प्रत्येकी दोन-दोन सामने खेळायचे आहेत. भारताचा सामना ३० जानेवारीला न्यूझीलंड आणि २ फेब्रुवारीला नेपाळशी होणार आहे. पाकिस्तानी संघ बांगलादेश आणि आयर्लंडशी भिडणार आहे.
सुपर सिक्स फेरीच्या गट २ मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीचे सामने ६ आणि ८ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तर विश्वचषकाचा अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे.