Join us  

U19 World Cup: केंद्र सरकारच्या पॉलिसीमुळे भारताला गमवावा लागला असता अंडर-१९ वर्ल्ड कप! जाणून घ्या वेस्ट इंडिजमध्ये नेमकं काय घडलं?

वेस्ट इंडिजमध्ये नुकताच झालेला अंडर-१९ वर्ल्ड कप भारताने यश धूलच्या नेतृत्वाखाली जिंकला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 8:23 PM

Open in App

U19 World Cup 2022 : भारतीय क्रिकेट संघाने (India Under 19 Cricket Team) १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यश धूलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखाली भारतीय संघाला हे यश मिळाले. मात्र या यशापूर्वी भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या स्पर्धेदरम्यान सहा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. मात्र विश्वचषकासाठी कॅरेबियन भूमीवर उतरताच संघ अडचणीत आला होता. कोरोना लसीकरण न झाल्याने संघातील सात खेळाडूंना विमानतळावर थांबवण्यात आले होते. ही घटना जानेवारीत घडली. भारत सरकारने अद्याप १८ वर्षाखालील साऱ्यांना सरसकट लसीकरण सुरू केलेले नाही असे समजवण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापक लोबजांग जी तेनझिंग यांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण सुमारे २४ तास हे खेळाडू विमानतळावरच होते. नंतर सरकारच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले. तत्पूर्वी, भारतीय संघ दुबईहून अॅमस्टरडॅममार्गे प्रदीर्घ प्रवास करून पोर्ट ऑफ स्पेनला पोहोचला होता.

पीटीआयच्या वृत्तानुसार, डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार आणि विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी यांचा समावेश कोरोनाची लसीकरण न झालेल्या खेळाडूंमध्ये होता. त्यांना विमानतळावरूनच भारतात परतण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर संघ व्यवस्थापक लोबजांग जी तेनझिंग यांनी ICC आणि BCCIच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्रकरण सोडवलं. त्याचबरोबर भारत आणि त्रिनिदाद सरकारलाही यात हस्तक्षेप करावा लागला.

सिक्कीम क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख तेनझिंग यांनी या घटनेबाबत माहिती दिली. "पोर्ट ऑफ स्पेनमध्ये उतरल्यानंतर आम्हाला गयानाला चार्टर फ्लाइटने जायचे होते. पण आमच्या सात खेळाडूंचे लसीकरण न झाल्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं. आम्ही इमिग्रेशन अधिकाऱ्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. भारताने अद्याप १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण सुरू केलेले नाही असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांनी आम्हाला पुढच्या फ्लाइटने घरी परतायला सांगितलं.

विमान कंपन्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला घेरले. जणू काही आम्ही पळूनच जाणार होतो. त्यातच एअरलाइन आणि इमिग्रेशन अधिकार्‍यांशी चर्चा सुरू असताना, लुफ्थान्सा फ्लाइटने देखील उड्डाण केले. परतीचे ते एकमेव फ्लाइट होते. मग तीन दिवसांनी पुढची फ्लाइट होती. यामुळे आम्हाला स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी वेळ मिळाला. मी मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. विमानतळाजवळील एका चांगल्या हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम करायचा होता. ICC आणि स्थानिक सरकारच्या मध्यस्थीनंतर अखेर हे प्रकरण मिटले. मुलांसाठी हा एक भयानक अनुभव होता, असंही तेनझिंग यांनी सांगितलं.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारतीय क्रिकेट संघ
Open in App