सिंगापूर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) च्या पारड्यात वजन टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) आता भारताला अल्टिमेटम दिले आहे. आयसीसीने 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी दिलेल्या करमुक्तीची भरपाई म्हणून 161 कोटी रुपये देण्याचे आदेश बीसीसीआयला दिले आहेत. तेही या वर्षाच्या आत भरण्यास सांगितले असून तसे न केल्यास 2023च्या वर्ल्ड कप यजमानपद गमवावे लागेल, असा इशाराही आयसीसीने दिला आहे.
सिंगापूर येथे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयसीसी सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. 2016 मध्ये झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये राज्य किंवा केंदीय सरकारकडून कोणतीही कर सवलत न दिल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे त्यांच्या बीसीसीआयला अल्टिमेटम पाठवले आहे. बीसीसीआयने याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा आदेश धुडकावून लावल्यास त्यांच्या महसूल वाट्यात कपात करण्यात येईल, असा इशाराही आयसीसीने दिला आहे.
2021ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 च्या वर्ल्ड कप सर्धेचे यजमानपद भारताला मिळण्याची शक्यता आहे, परंतु आयसीसीची मागणी पूर्ण न केल्यास तो मान भारत गमावू शकतो. त्या बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे बीसीसीआयने मागवले होते, परंतु आयसीसीकडून ते अद्याप देण्यात आलेले नाही. आयसीसीकडे असे कोणतेच मुद्दे नाहीत असा दावा बीसीसीआयकडून करण्यात आहे, तर एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या वृत्तानुसार माजी अध्यक्ष शशांक मनोहर वैयक्तिक स्वार्थासाठी बीसीसीआयला लक्ष्य करत असल्याचे समोर येत आहे.
"बीसीसीआयवर टीका करण्याची फॅशनच सुरू झाली आहे. हे म्हणजे हात वाढणाऱ्याचे हात कापण्यासारखे आहे. क्रिकेटचा डोलारा बीसीसीआयवर अवलंबून आहे आणि आयसीसी म्हणते भारत वर्ल्ड कपचे आयोजन करू शकत नाही? आणि तेही आयसीसीचे अध्य एक भारतीय आहेत तेव्हा? ही मस्करी आहे का?, '' अशी टीका बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली आहे.