ICC Under-19 World Cup Final IND vs AUS : नोव्हेंबर २०२३ मध्ये गुजरात येथील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने १४० कोटी भारतीयांना रडवले होते. वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हार मानण्यास भाग पाडले होते. त्या आठवणी ताज्या असताना आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा फायनल सामना सुरू आहे. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करताना ऑस्ट्रेलियाची धावगती आटवली, परंतु एक चूक भारताला महागात पडू शकते.
राज लिम्बानीने तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कोन्स्टॅसचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. पण, हॅरी डिक्सन व कर्णधार ह्युज वैबगेन यांनी ऑसींचा डाव सावरताना भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला. नमन तिवारी याच्या पहिल्या षटकात १५ धावा चोपल्या गेल्या होत्या, परंतु २१व्या षटकात त्याला पाचारण केले गेले आणि त्याने ही सेट जोडी तोडली. त्याने वैबगेन ( ४८) व डिक्सन ( ४२) या दोघांनाही माघारी पाठवले. इथे भारताला सामन्यावर पकड घेता आली असती, परंतु हरजस सिंग ( ५५) व रायन हिक्स ( २०) यांनी चांगला खेळ केला.
पाकिस्तानला रडवणारा ऑलिव्हर पिक पुन्हा एकदा खेळपट्टीवर उभा राहिला. परंतु मुशीर खान व लिम्बानी यांनी विकेट्स घेऊन ऑसींना धक्के दिले. पिक व टॉम स्ट्रॅकर यांनी संघाला ७ बाद २५३ धावांपर्यंत पोहोचवले. पिकने नाबाद ४६ धावा चोपल्या. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोत्तम २४२ धावांचा ( इंग्लंड वि. न्यूझीलंड, १९९८) यशस्वी पाठलाग झाला होता आणि आज भारताची कसोटी लागणार आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑसींना भागीदारी करण्याची दिलेली संधी फायनलमध्ये महागात पडू शकते.