ICC Under-19 World Cup - १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने मजबूत धावसंख्या उभी केली, परंतु हा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. या सामन्यात बांगलादेशचे आरिफुल इस्लाम आणि महफुजुर रहमान रब्बी हे भारताचा कर्णधार उदय सहारन याच्याशी भांडताना दिसले .
या वादग्रस्त घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये उदय सहारन अम्पायरशी बोलताना दिसतोय आणि वादाची तक्रार करत आहे. इस्लाम आणि महफुजुर रहमान रब्बी यांनी अम्पायरसमोर उदयसोबत भांडण केलं. भारतीय कर्णधार त्याच्या अंगावर जवळपास धावून गेलाच होता, परंतु अम्पायरने लगेच मधस्थी केली आणि भांडण थांबवले. वादाचे नेमके स्वरूप अस्पष्ट आहे.
१९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध ७ बाद २५१ धावा केल्या.आदर्श सिंग ( ७६), कर्णधार उदय सहारान ( ६४) यांच्या अर्धशतकी खेळीला प्रियांषू ( २३), अरावेल्ली ( २३), सचिन ( २६) यांनी साथ दिली.बांगलादेशच्या मरूफ मृधाने ८-१-४३-५ अशी अप्रतिम गोलंदाजी केली.
- या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना आज बांगलादेशशी खेळत आहेत. भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त अ गटात अमेरिका आणि आयर्लंड आहेत. भारताचा दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडशी तर तिसरा सामना २८ जानेवारीला अमेरिकेशी होणार आहे.
- एकूण १६ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर-६ मध्ये पोहोचतील, त्यापैकी १२ संघ दोन गटात विभागले जातील. त्यानंतर अव्वल दोन संघ उपांत्य फेरी खेळतील जी बेनोनी येथे ६ आणि ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल जेव्हा अंतिम सामना बेनोनी येथे खेळवला जाईल.