भारताच्या युवा संघानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 234 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 159 धावांवर तंबुत पाठवून 74 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्तिकनं या सामन्यात 8 षटकांत 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा कार्तिक हा कधीकाळी आपल्या वडिलांसोबत शेतात काम करायचा. पाठीवर ओझे वाहणारा कामगार ते आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडू, असा हा कार्तिकचा प्रवास सोपा नक्की नव्हता. गरीब कुटुंबातील कार्तिकचा जन्म... कार्तिकला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांना बरेच काबाडकष्ट करावे लागले. एक काळ असाही होता जेव्हा कार्तिकला आपल्या वडिलांसोबत शेतात राबावे लागले. या सर्व परिस्थितीवर मात करत कार्तिकनं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
17व्या वर्षी कार्तिकनं कूच बिहार चषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि
उत्तर प्रदेशच्या रणजी संघात स्थान पटकावले. त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर माजी विजेत्या विदर्भ संघाला पराभवाची चव चाखवली होती. त्यानंतर त्याला 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या कॅप्ममध्ये बोलावणं आलं. तो म्हणाला,''या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या वडिलांनी बरेच कष्ट घेतले. मला बीसीसीआयचे व्यवस्थापक अमित सिद्धेश्वर यांनी कॉल करून 19वर्षांखालील संघाच्या निवड प्रक्रियेसाठी बोलावलं.''
19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियानं 9 बाद 233 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कार्तिकनं पहिल्याच षटकात कांगारूंच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. पहिल्याच चेंडूवर जॅक फ्रेजर मॅकगर्क धावबाद झाला, त्यानंतर कर्णधार कॅप्टन मॅकेंजरी हार्वे आणि लचलम हार्वे हाही माघारी परतला. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज अवघ्या 17 धावांवर माघारी परतले होते. भारतानं कांगारूंचा संपूर्ण डाव 43.3 षटकांत 159 धावांत गुंडाळला.
Web Title: ICC under 19 world cup: Know all about uttar pradesh boy and indian bowler kartik tyagi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.