भारताच्या युवा संघानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 234 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 159 धावांवर तंबुत पाठवून 74 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्तिकनं या सामन्यात 8 षटकांत 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा कार्तिक हा कधीकाळी आपल्या वडिलांसोबत शेतात काम करायचा. पाठीवर ओझे वाहणारा कामगार ते आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडू, असा हा कार्तिकचा प्रवास सोपा नक्की नव्हता. गरीब कुटुंबातील कार्तिकचा जन्म... कार्तिकला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांना बरेच काबाडकष्ट करावे लागले. एक काळ असाही होता जेव्हा कार्तिकला आपल्या वडिलांसोबत शेतात राबावे लागले. या सर्व परिस्थितीवर मात करत कार्तिकनं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.