ICC WC 2023 Qualifier : भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी सुरू आहे. काल आयर्लंडला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात आयर्लंडचा ओमानकडून पराभव झाला होता आणि काल स्कॉटलंडने थरारक विजयाची नोंद केली. कर्टीस कॅम्फेरच्या ( Curtis Campher) १२० धावांच्या जोरावर आयर्लंडने २८६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडचे ७ फलंदाज १५२ धावांवर तंबूत परतले होते. पण, ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मायकेल लेस्कने ( Michael Leask) ६१ चेंडूंत ९१ धावांची धडाकेबाज खेळी करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. स्कॉटलंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २८९ धावा केल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर स्कॉटलंडने बुलावायो येथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडचा निम्मा संघ ७० धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर कर्टीसने सहाव्या विकेटसाठी जॉर्ज डॉकरेलसोबत १३६ धावांची भागीदारी केली. फलकावर २०६ धावा असताना डॉकरेल ( ६९) बाद झाला. कर्टीसने दमदार खेळ सुरू ठेवताना १०८ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह १२० धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर आयर्लंडने ८ बाद २८६ धावा उभ्या केल्या. स्कॉटलंडच्या ब्रेंडन मॅक्मुलनने ३४ धावांत ५ फलंदाज बाद केले.