ICC WC 2023 Qualifier : वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतून दोन संघ भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत आणि वेस्ट इंडिज व श्रीलंका हे दिग्गज संघच आघाडीवर असतील अशी चर्चा होती. पण, सध्यातरी चित्र वेगळंच दिसतंय...ओमानने ब गटात, तर झिम्बाब्वेने अ गटात सलग दोन विजयांची नोंद करून टॉप स्थान पटकावले आहे. ओमानच्या सलग दुसऱ्या विजयामुळे माजी वर्ल्ड कप विजेत्या श्रीलंकेचं टेंशन वाढलं आहे.
पहिल्या सामन्यात आयर्लंडला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ओमानने संयुक्त अरब अमितारीविरुद्धही चांगला खेळ केला. यूएईने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २२७ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ओमानने ४६ षटकांत ५ बाद २२८ धावा करत सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना यूएईचे दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतले. वृत्या अरविंद ( ४९) आणि रमीझ शाहजाद ( ३८) यांनी डाव सावरला. आसीफ खानने २७ धावांची उपयुक्त खेळी केल्यानंतर पुन्हा यूएईची गाडी घसरली. आयान खानने नाबाद ५८ धावा करून संघाला २२७ धावांपर्यंत पोहोचवले. ओमानच्या जय ओडेड्रा ( ३-३१), बिलाल खान ( २-४६) व फय्याज बट ( २-४९) यांनी चांगली गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात ओमानचे सलामीवीरही १४ धावांवर माघारी परतले. अकिब इलियास ( ५३) व शोएब खान ( ५२*) यांनी अर्धशतकी खेळी करून ओमानची गाडी रुळावर आणली. मोहम्मद नदीमनेही नाबाद ५० धावा केल्या. अयान खानने ४१ धावांचे योगदान देत संघाला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.