लंडन: कसोटी क्रिकेटला अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्यात बीसीसीआय अपयशी ठरल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने केली आहे. अहमदाबादच्या नव्या खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा दोन दिवसात दहा गड्यांनी धुव्वा उडवित चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी संपादन केली. यावर संतापलेल्या वॉनने स्तंभात,‘भारताची मनमानी अशीच सुरू राहिल्यास आयसीसीचे महत्त्व संपायला वेळ लागणार नाही,’ असा इशारा दिला.
बीसीसीआयबद्दल नाराजीचा सूर आळवताना वॉन पुढे म्हणाला,‘भारताला त्यांच्या मर्जीनुसार खेळपट्टी तयार करण्यासाठी आयसीसी सूट देते. यामुळे क्रिकेटचे नुकसान होत आहे. अशावेळी आता प्रसारणकर्त्यांनीच पुढे यावे आणि झालेली नुकसान भरपाई मागावी, म्हणजे किमान परिस्थिती बदलेल. खेळाडू खराब खेळले आणि सामना संपला, हे मान्य आहे; पण बोर्डाने इतकी खराब खेळपट्टी का तयार केली, याचे उत्तर मिळायलाच हवे.’‘प्रसारणकर्त्याचे तीन दिवस खराब झाले तरी त्याला पैसे मोजावेच लागले. अशावेळी प्रसारणकर्ते नाराज असतील. पुढील कसोटीचे प्रसारण करण्याआधी दोनदा विचार करतील. भारताचा विजय ‘फुसका’ होता, असे सांगून वॉनने यजमान संथ उत्कृष्ट होता, हे मात्र कबूल केले.
ख्रिस व्होक्स रोटेशन प्रणालीनुसार इंग्लंडला रवानाअहमदाबाद : इंग्लिश क्रिकेट बोर्ड सर्व खेळाडूंसाठी रोटेशन धोरण राबवीत आहे. प्रत्येक खेळाडूला विश्रांती मिळावी म्हणून काहींना मालिकेसाठी किंवा सामन्यासाठी विश्रांती देणे, असे हे धोरण आहे. यानुसार वेगवान गोलंदाज ख्रिस व्होक्स याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली. तो मायदेशी परत गेला.व्होक्स हा द.आफ्रिका, श्रीलंका आणि भारत दौऱ्यात कसोटी संघात होता. त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. व्होक्स अखेरचा वन डे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या सप्टेंबरमध्ये खेळला होता. ईसीबीने व्होक्सला परत बोलावले. यावर केविन पीटरसन आणि इयान बेल या माजी खेळाडूंनी टीका केली. जोस बटलर आणि मोईन अली हे पहिल्या कसोटीनंतर परत गेले तर, जॉनी बेयरेस्टॉ आणि मार्क वूड सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने खेळू शकले नव्हते.