नवी दिल्ली - अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या फटकेबाजीने नावलौकीक करणाऱ्या शेफाली वर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सध्याच्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये शेफालीने आतापर्यंत केलेल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहे. शेफालीच्या तुफानी फलंदाजीच्या सुरुवातीने सुरूवातीस जवळपास प्रत्येक सामन्यात भारतीय संघाचा फायदा झाला. यामुळे टीम इंडिया प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे.
उपांत्य सामन्यात गुरुवारी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु, त्याच्या पूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेफाली महिला ट्वेंटी-२० स्पर्धेत नंबर वन फलंदाज ठरली आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत शेफालीने अव्वल स्थान पटकावलं आहे. केवळ १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या शेफाली वर्माने आयसीसी जागतिक महिला ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
ऑस्ट्रेलियायात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शेफालीने ४ सामन्यांत १६१ धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर तिने ही फिनिक्स भरारी घेतली. भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राज हिच्यानंतर जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शेफाली ही पहिलीच भारतीय महिला फलंदाज ठरली.
शेफालीने आतापर्यंत महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ४७, ४६, ३९ आणि २९ धावांची तुफानी खेळी खेळली आहे. यावेळी सलग दोनदा ती प्लेअर ऑफ दि मॅच देखील होती. सलामीवीर शेफाली वर्मा ७६१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे न्यूझीलंडचा सुजी बेट्स दुसर्या स्थानावर आहे. तिच्याकडे ७५० गुण आहेत.
शेफालीने सुजी बेट्सला दुसऱ्या नंबरवर ढकललं आहे. ऑक्टोबर २०१८ पासून सुझीने हे स्थान कायम ठेवलं होतं. वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरकडून तिने हा नंबर पटकावला तेव्हापासून ती १ नंबरलाच होती. महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात किमान 200 धावा काढलेल्या क्रिकेटपटूंमध्ये शेफाली वर्मा हिने १४६.९६ च्या स्ट्राइक रेटने ४८५ धावा केल्या आहेत. शेफालीच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या चोले ट्रियोनचा नंबर लागतो.