ICC Womens Future Tours Programme : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२५-२०२९ पर्यंत महिला क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फ्यूचर टूर्स प्रोग्राम (FTP) म्हणून याला नाव देण्यात आले आहे. यातील सामने ICC महिला चॅम्पियनशिप सायकलचा एक भाग असतील, ज्या अंतर्गत पुढील चार वर्षांत महिला क्रिकेट संघांमध्ये ४४ वन डे मालिका खेळवल्या जातील. विशेष बाब म्हणजे २०२५-२०२९ या कालावधीत महिला क्रिकेटपटूंसाठी दरवर्षी आयसीसी स्पर्धा आयोजित केली जाईल.
दरम्यान, २०२९ चा महिला क्रिकेट विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आखण्यात आला आहे, ज्यामध्ये ११ संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर महिला क्रिकेटच्या वाढीला हातभार लावण्यासाठी झिम्बाब्वेचा महिला संघ पदार्पण करणार आहे. पुढील चार वर्षांत प्रत्येक संघ चार वन डे मालिका मायदेशात आणि चार परदेशी भूमीवर खेळणार आहे. अशा प्रकारे एकूण ४४ मालिका खेळवल्या जातील, प्रत्येक मालिका ३ सामन्यांची असेल. म्हणजेच सर्व संघांमध्ये एकूण १३२ सामने होणार आहेत.
२०२५ मध्ये होणार्या महिला क्रिकेट विश्वचषकानंतर हे वेळापत्रक लागू होईल. २०२९ पर्यंत महिला क्रिकेट संघ ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. २०२५ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक होणार आहे, ज्याचे आयोजन भारत करणार आहे. २०२६ मध्ये महिला ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी फक्त पुरुषांच्या क्रिकेटमध्येच आयोजित केली जात होती, परंतु २०२७ मध्ये पहिल्यांदाच महिला संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात असतील. २०२८ मध्ये पुन्हा ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे, जो ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक सहावेळा जिंकला आहे.