Join us  

टी२० महिला विश्वचषक: विजयी हॅटट्रिकचा भारताचा निर्धार

न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीसाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 2:16 AM

Open in App

मेलबोर्न : टी२० विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेशला धूळ चारल्याने उत्साहात असलेल्या भारतीय महिला संघाची गाठ गुरुवारी न्यूझीलंडविरूद्ध पडेल. हा सामना जिंकून विजयी हॅट्ट्रिक सह उपांत्य फेरीकडे कूच करण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे.भारताने ऑस्ट्रेलियाचा १७, तर बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. पाच संघाचा समावेश असलेल्या अ गटात अव्वल स्थानी असलेल्या भारताचे दोन सामन्यात चार गुण आहेत. न्यूझीलंडला लोळविल्यास हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीकडे भक्कम वाटचाल करणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात गोलंदाजांनी भेदक कामगिरी केली. आता हरमनप्रीत आणि स्मृती मानधना यांच्याकडून फलंदाजीत बऱ्याच अपेक्षा आहेत. १६ वर्षांच्या शेफाली वर्माने आक्रमक खेळ केला असून तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करणारी जेमिमा रॉड्रिग्ज हिनेही २६ आणि ३४ धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत मात्र फारशी प्रभावी ठरली नव्हती. मधल्या फळीत दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ४९, तर वेदा कृष्णमूर्तीने बांगलादेशविरुद्ध ११ चेंडूंत नाबाद २० धावांचे योगदान दिले होते. गोलंदाजीत पुनम यादवने दोन्ही सामन्यात प्रभावी मारा केला. तिने आतापर्यंत ७ बळी घेतले असून शिखा पांडे हिची तिला चांगली साथ लाभली. शिखाचे ५ बळी झाले आहेत.भारताविरुद्ध न्यूझीलंडचा रेकॉर्डही चांगला आहे. दोन्ही संघात झालेले मागचे तिन्ही सामने त्यांनी जिंकले. वर्षभराआधी स्थानिक मालिकेत भारताचा त्यांनी ३-० असा पराभव केला होता. २०१८ च्या वेस्ट इंडिजमध्ये खेळविण्यात आलेल्या विश्वचषकात भारताने या संघाचा ३४ धावांनी पराभव केला. हरमनप्रीतने त्या सामन्यात १०३ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडने श्रीलंकेचा ७ गडी राखून सहज पराभव केला. त्या सामन्यात कर्णधार सोफी डिव्हाईन हिने नाबाद ७५ धावा ठोकल्या होत्या. (वृत्तसंस्था)शेफालीमुळे भारतीय संघ संतुलित - मानधना‘शेफाली वर्माने फार कमी वयात टी२० विश्वचषकात शानदार कामगिरीच्या जोरावर अनेकांचे लक्ष वेधले. तिच्यामुळे भारतीय संघ अधिक संतुलित बनला,’ असे मत भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिने व्यक्त केले.स्मृती म्हणाली,‘ शेफालीने या खेळातील आपली क्षमता सिद्ध केली. गेल्या दोन-तीन वर्षांत मी पॉवर प्लेमध्ये शेकडो धावा केल्या. आता शेफालीही हीच कामगिरी करीत आहे. यामुळे संघात संतुलन आले. शेफालीचा निर्धास्त खेळ पाहून अन्य फलंदाजांना प्रेरणा लाभते. तिच्यासोबतीने फलंदाजी करणे सोपे होते.’ शेफालीने विश्वचषकाच्या दोन सामन्यात ६८ धावा केल्या असून त्यात ५ षटकार व ७ चौकारांचा समावेश आहे.प्रतिस्पर्धी संघभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर .न्यूझीलंड : सोफी डिव्हाईन (कर्णधार), रोजमेरी मेयर, अमेलिया केर, सूजी बेट्स, लॉरेन डाउन, मॅडी ग्रीन, होली हडलस्टन, हेले जेन्सेन, लीग कास्पेरेक, जेस केर, केटी मार्टिन , केटी पार्किन्स, अ‍ॅना पीटरसन, रेचेल प्रीस्ट, ली ताहुहु .

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट