महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या नवव्या हंगामातील चार सेमी फायनलिस्ट संघ ठरले आहेत. 'अ' गटातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या महिला संघांनी आधीच सेमीफायनल गाठली होती. मंगळवारी 'ब' गटातील इंग्लंड आणि वेस्ट इंडिज महिला संघातील लढतीनंतर या गटातून कोणते २ संघ सेमी फायनल खेळणार ते चित्र स्पष्ट झाले. वेस्ट इंडिजच्या संघाने इंग्लंडला पराभवाचा दणका देत त्यांना या स्पर्धेतून आउट केले. 'ब' गटातून वेस्ट इंडिजसह दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे.
२ वर्ल्ड चॅम्पियन संघासह २ संघांची पाटी अजूनही आहे कोरी
यंदाच्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणाऱ्या ४ संघांपैकी दोन संघ हे वर्ल्ड चॅम्पियन आहेत. तर दोन संघ असे आहेत ज्यांनी आतापर्यंत एकदाही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली नाही. यातील ऑस्ट्रेलिया महिला संघाने आतापर्यंत झालेल्या ८ स्पर्धेत ६ वेळा जेतेपद पटकावले आहे. याशिवाय वेस्ट इंडिज महिला संघाने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघाला शह देत पहिली वहिली ट्रॉफी जिंकली होती. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड महिला संघाने आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही.
पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार सामना
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'अ' गटात ४ पैकी ४ सामने जिंकून अव्वलस्थानी राहिलेला ऑस्ट्रेलियन महिला संघ 'ब' गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघा विरुद्ध अर्थात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध पहिली फायनल खेळताना दिसेल. गुरुवारी १७ ऑक्टोबर, २०१४ रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ६ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे त्यांच्यासमोर गत चॅम्पियन आणि सर्वाधिक सहा वेळा महिला टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज असेल.
दुसऱ्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड समोर वेस्ट इंडिज महिला संघाचे चॅलेंज
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड अशी लढत रंगणार आहे. हा सामना १८ ऑक्टोबर, २०१४ रोजी शारजाहच्या मैदानात खेळवण्यात येईल. यातून जिंकेल तो फायनलसाठी पात्र ठरेल. पहिल्या सेमी फायनलमधील विजेता आणि दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता संघ यंदाच्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना २० ऑक्टोबर, २०२४ रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळताना दिसेल. आधीचा विजेताच फायनल बाजी मारणार की यावेळी नवा इतिहास घडणार? ते पाहण्याजोगे असेल.