Shafali Verma 2000 T20I runs Record छ महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात अखेर भारताची सलामी जोडी जमली. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या दोघींनी पॉवर प्लेमध्ये आपली पावर दाखवली. पहिल्या दोन सामन्यात संघर्ष करणाऱ्या दोघींनी पहिल्या ६ षटकात संघाच्या धावफलकावर ४१ धावा लावल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळीसह शेफाली वर्मानं खास टप्पाही गाठला.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
शेफाली वर्मानं टी-२० कारकिर्दीत २००० धावांचा पल्ला पार केला आहे. २० वर्षीय स्फोटक बॅटर शेफाली वर्मानं २०१९ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी शेफालीच्या खात्यात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ८३ सामन्यातील ८२ डावात १९८२ धावांची नोंद होती. यात ८१ या सर्वोच्च धावसंख्येसह १० अर्धशतकांचा समावेश होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १८ धावा करताच तिने २ हजार धावांचा टप्पा पार केला.
असा पराक्रम करणारी सर्वात युवा बॅटर ठरली शेफाली
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात २००० धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम शेफाली वर्माच्या नावे झाला आहे. तिने २० वर्षे २५५ वय असताना हा पल्ला गाठला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात आपला तोरा दाखवत तिने हा पराक्रम करून दाखवला. शेफालीने आयर्लंडची बॅटर गॅबी लुईसचा विक्रम मोडला आहे. तिने २३ वर्षे ३५ दिवस वयात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठला होता.
एलिट क्लबमध्ये झाली एन्ट्री
महिलां T20I मध्ये २००० धावांचा पल्ला गाठणारी शेफाली वर्मा पाचवी भारतीय बॅटर आहे. याआधी स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, मिताली राज आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी हा टप्पा गाठला होता. २०१९ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी शेफालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.