Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!

न्यूझीलंड महिला संघाने ५८ धावांनी सामना खिशात घातला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:03 PM2024-10-04T23:03:39+5:302024-10-04T23:11:51+5:30

whatsapp join usJoin us
ICC Womens T20 World Cup 2024 INDW vs NZW India Women Loss First Game Against New Zealand Women by 58 runs | Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!

Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला महिला टी-२० वर्ल्ड स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत त्यांनी आपला गेम प्लान परफेक्ट ठरवला. एवढेच नाही तर गोलंदाजीतील पॉवर प्लेमध्येही त्यांनी कमाल केली. परिणामी भारतीय महिला संघाच्या पदरी निराशा आली. 

न्यूझीलंडच्या संघाकडून कॅप्टनच्या बॅटमधून आली फिफ्टी

पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या  न्यूझीलंडच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४६ चेंडूत ६७ धावा ठोकल्या. कर्णधार सोफी डिव्हाइन हिने ३६ चेंडूत नाबाद ५७ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने निर्धारित २० षटकात  ४ विकेट्सच्या मोबदल्यात १६० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ अपयशी ठरला. १०२ धावांत भारतीय महिला संघाचा खेळ खल्लास झाला. न्यूझीलंड महिला संघाने ५८ धावांनी सामना खिशात घातला.

स्मृती, हरमनप्रीत, जेमिमा कुणीच नाही चाललं   

भारतीय ताफ्यातील एकाही बॅटरला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या दोघींनी भारताच्या डावाला सुरुवात केली. शफाली वर्मानं अवघ्या २ धावांची भर घालत विकेट गमावली.  तिच्यापाठोपाठ स्मृती मानधनाही १२ धावांवर माघारी फिरली. सलामीच्या बॅटर स्वस्तात आटोपल्यानंतर सर्वांच्या नजरा या कॅप्टन हरमनप्रीत कौरवर होत्या. पण तिच्यासाठी तिसरा नंबर अनलकीच ठरला. ती १५ धावांची भर घालून तंबूत परतली. जेमिमा रॉ़ड्रिग्ज १३(११), रिचा घोष १२ (१९) आणि दीप्ती शर्मा १३ (१८) या भरवशाच्या महिला खेळाडूंनीही मैदानात फार काळ तग धरला नाही. 

पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकण्याचे मोठं चॅलेंज

भारतीय महिला संघ आता रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघावर या सामन्यात दबाव असेल. कारण पाकिस्तान महिला संघाने साखळी फेरीतील आपला पहिला सामना जिंकला आहे. श्रीलंकेला पराभूत करून पाक संघ दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.  स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने पाक विरुद्धची लढत भारतीय महिला संघासाठी खूप महत्त्वाची असेल.  

Web Title: ICC Womens T20 World Cup 2024 INDW vs NZW India Women Loss First Game Against New Zealand Women by 58 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.