बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सलामीच्या लढतीनं यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्कॉटलंडचा संघ पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे या संघासाठी यांदाची महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खासच आहे. पुरुष क्रिकेटर असो किंवा महिला क्रिकेट अनेकदा खेळाडू फिल्डवरील आपल्या लूकमुळेही चर्चेचा विषय ठरतात. महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हिजाब घालून मैदानात उतरलेल्या महिला खेळाडूनं सर्वांचे लक्षवेधून घेतले.
हिजाब घालून मैदानात उतरली ही महिला खेळाडू
युएईच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या लढतीत स्कॉटलंडच्या ताफ्यातील महिला क्रिकेटर हिजाब घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. स्कॉटलंडच्या संघातील अबताह मकसूद (Abtaha Maqsood) ही हिजाब घालून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी युकेतील पहिली मुस्लिम महिला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सराव सामन्यात तिने आपल्या स्वत:च्या गोलंदाजीवर घेतलेला अप्रतिम झेलही चर्चेचा विषय ठरला होता.
२५ वर्षीय अबताह मकसूद ही लेग स्पिनर आहे. २०१८ पासून ती स्कॉटलंड संघाचा भाग आहे. ११ जून १९९९ मध्ये ग्लास्गोमध्ये जन्मलेली ही खेळाडू वयाच्या ११ व्या वर्षांपासून क्रिकेट खेळते. क्रिकेटशिवाय अबताह मकसूद ही एक तायकांदे प्लेयरही राहिली आहे. या खेळात तिने ब्लॅक बेल्टही कमावला आहे. २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत ती आपल्या देशाची ध्वजवाहकही होती.
पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्ड कप सामन्यातील कामगिरी
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात तिने २४ धावा खर्च केल्या. गोलंदाजीत संघाला विकेट मिळवून देण्यात ती अपयशी ठरली असली तरी रनआउटच्या रुपात तिने बांगलादशची बॅटर ताज नेहार हिला खातेही उघडू न देता माघारी धाडले. तिच्या क्रिकेटच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर स्कॉटलंडच्या संघाकडून आतापर्यंत तिने ८ वनडे आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेत तिच्या खात्यात १९ तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तिच्या खात्यात ५० हून अधिक विकेट्स आहेत.