महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने २०१६ वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडीज महिला संघाला मोठा दणका दिला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडीज महिला संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ११८ धावा केल्या होत्या. या धावसंख्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडनं अगदी आरामात १३ चेंडू राखून संघाचा विजय सुनिश्चित केला.
टेलर वगळता अन्य साऱ्याच ठरल्या फिक्या
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड (Laura Wolvaardt)हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आफ्रिकेच्या ताफ्यातील गोलंदाजांनी ठराविक अंतराने वेस्ट इंडीज महिला संघाला धक्क्यावर धक्के दिले. वेस्ट इंडीजच्या संघातील स्टेफनी टेलर (Stafanie Taylor) वगळता अन्य कोणत्याही बॅटरला चांगली खेळी करता आली नाही. टेलरनं ४१ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या संघाला निर्धारित २० षटकात ६ बाद ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको लाबा (Nonkululeko Mlaba) हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मेरिझॅन कॅप हिच्या खात्यात २ विकेट्स जमा झाल्या.
सलामी जोडीनं अगदी आरामात चेस केलं टार्गेट
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ११९ धावांचा पाठलाग अगदी सहज आणि आरामात केला. कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने ताझमिन ब्रिट्सव हिच्या साथीन संघाच्या डावाला सुरुवात केली. दोघींनी कमालीच्या ताळमेळ दाखवत मॅच एकतर्फी संपवली. दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टननं ५५ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ५९ धावांची खळी केली. दुसरीकडे ब्रिट्स हिने ५२ चेंडूत ५७ धावा काढल्या. या खेळीत तिच्या बॅटमधून ६ चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.