ICC Women’s T20 World Cup 2024 : उद्यापासून अर्थात गुरुवारपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाला प्रारंभ होत आहे. भारत चार तारखेला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी प्रत्येक संघाने दोन-दोन सराव सामने खेळले. टीम इंडियाने सराव सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. त्यामुळे विश्वचषकाच्या तोंडावर भारताचा विजयरथ कायम असल्याचे दिसते. महिला विश्वचषकात चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दहा देशांचा समावेश आहे.
भारतीय महिला संघाने आपल्या पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १४१ धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या १२१ धावांत रोखले. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. हा सामना भारतीय संघाने २८ धावांनी आपल्या नावावर केला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला नेहमीच वरचढ राहिला आहे. अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. यंदाच्या विश्वचषकात १३ तारखेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होईल. अनुभवी खेळाडूंची फळी असलेल्या भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान असेल. कांगारुंनी सर्वाधिकवेळा विश्वचषक जिंकला आहे. सहा तारखेला भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असतील.
विश्वचषकासाठी भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.
भारताचे वेळापत्रक - ४ ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ६ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी ३.३० वाजल्यापासून९ ऑक्टोबर - विरुद्ध श्रीलंका, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१३ ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१७ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना१८ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना२० ऑक्टोबर - अंतिम सामना