भारतीय महिला संघाची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात पराभवानं झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान अधिक कठीण झाले आहे. भारतीय संघ 'अ' गटात असून आता त्यांच्यासमोर पाकिस्तान, श्रींलका आणि ऑस्ट्रेलिया या संघाचे आव्हान असमार आहे. जर स्पर्धेत टिकायचे असेल तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका सुधारून हरमनप्रीत ब्रिगेडला सर्वोच्च कामगिरी करावी लागेल.
पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेसाठी सज्ज झालेल्या भारतीय महिला संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ना बॉलिंग- फिल्डिंग जमली ना बॅटिंगमध्ये छाप सोडता आली. पुन्हा पुन्हा त्याच चुका संघाला महागात पडल्या. परिणामी या गटातून आता न्यूझीलंडसह पाकिस्तानचा संघ सेमीच्या शर्यतीत भारताच्या एक पाऊल पुढे आहे. एक नजर पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या ५ गोष्टींवर... खेळपट्टी अन् चेंडूच्या गतीचा अंदाज घेण्यात चुकल्या बॅटर
दुबईच्या मैदानात दुसऱ्या डावात दव पडल्यामुळे गोलंदाजांसाठी एक चॅलेंज निर्माण झालं होते. पण भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवरील चेंडूच्या गतीचा अंदाज घेता आला नाही. परिणामी न्यूझीलंडच्या पेसर्संनी ७ विकेट्स घेतल्या. जी खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य वाटत होती, तिथं भारतीय फलंदाजी अपयशी ठरली.
मोजक्या फलंदाजावर अवलंबून आहे भारतीय महिला संघ
भारतीय महिला संघ मोजक्या बॅटर्सवर अवलंबून आहे. स्मृती मानधना. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज या तिघी सोडल्या तर मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणारा चेहरा भारतीय महिला संघात दिसत नाही. या तिघींना बॅटिंगमध्ये आलेले अपयश हे देखील संघाच्या पराभवाचे एक कारण आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील डोकेदुखी
भारतीय महिला संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी कॅप्टन हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली आहे. या क्रमांकावर तिची कामगिरी फारशी चांगली नाही. दोन सराव सामन्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्धही ते दिसून आले. हा निर्णय हरमनप्रीत कौरसह टीम इंडियाला अडचणीत आणणारा ठरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा निर्णयही फसला
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ अतिरिक्त गोलंदाजासह मैदानात उतरला होता. त्यामुळे फलंदाजी कमकूवत झालीच. शिवाय पूजा वस्त्राकरला फक्त एक ओव्हर मिळाली. डेथ ओव्हरमध्ये चेंडू स्पिनरच्या हाती होता. सोफी डिव्हाइन हिने त्याचा फायदा उठवत सहज धावा काढल्या.
फिल्डिंगमध्ये गडबड
भारतीय महिला संघ फिल्डिंगच्या बाबतीत खूपच कमकूवत दिसतो. ही भारतीय महिला संघातील बऱ्याच दिवसांपासून दिसणारी मोठी समस्या आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही ते पाहायला मिळाले. रिचा घोषनं एक सोपा झेल सोडला. समीरेषेवरही ढिसाळ फिल्डिंग दिसून आली. या गोष्टींमुळे पराभवात आणखी भर पडली.