ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात हातभार लावला. मूनीनं अखेरपर्यंत खिंड लढवताना टीम इंडियासमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलं. ऑस्ट्रेलियानं जवळपास ९.३० च्या सरासरीनं धावांचा पाऊस पाडला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे आहे. भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची ही अंतिम फेरीत खेळण्याची सहावी वेळ आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यासाठी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माकडे चेंडू सोपवला. अॅलिसा हिलीनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून तिचे स्वागत केले. पण, पाचव्याच चेंडूवर शेफाली वर्मानं हिलीचा सोपा झेल सोडला. ऑसींनी पहिल्याच षटकात १४ धावा खेचल्या. अॅलिसा हिलीनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारी ती दुसरी ऑस्ट्रेलियन, तर एकूण ११ वी फलंदाज ठरली आहे. हिलीने बेथ मूनीसह फटकेबाजी सुरूच ठेवली. हिलीनं दीप्तीच्या दुसऱ्या षटकात ९ धावा कुटल्या. चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिच्याच गोलंदाजीवर बेथ मूनाच सोपा झेल सोडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४९ धावा केल्या.
हिलीनं आठव्या षटकात राजेश्वरीच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत षटकार खेचून चाहत्यांची वाहवाह मिळवली. हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह हिलीनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हिलीचे हे अर्धशतक आयसीसी स्पर्धेतील पुरुष ( वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ) आणि महिला ( वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप) सर्वात जलद अर्धशतक ठरले. राधा यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तिनं हिलीला वेदा कृष्णमुर्तीकरवी झेलबाद केले. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.
हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर आणि हिली मॅथ्यू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावा चोपल्या होत्या. बेथ मूनीनंही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे तिचे ९वे अर्धशतक ठरले. ऑसी कर्णधार मेन लॅनिंग १६ धावा करून माघारी परतली. दीप्ती शर्मानं तिला बाद केले. त्याच षटकात दीप्तीनं ऑसींना आणखी एक धक्का दिला. गार्डनर दोन धावा करून यष्टिचीत झाली. त्यानंतर मूनीनं एकटीनं खिंड लढवली. पूनम यादवनं ऑसींच्या राचेल हायनेसला ( ४) बाद केले. पण, मूनीनं ऑसींना मोठी धावसंख्या उभारून दिली होती. ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान आहे. मूनी ७८ धावांवर नाबार राहिली.
महत्त्वाच्या बातम्या
विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार
अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?
Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान
अॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला
अॅलिसा हिलीने रचला मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये पार केला दोन हजार धावांचा टप्पा
Web Title: ICC Women's T20 World Cup, Final: India need 185 runs to win, Australia 4-184 from their 20 overs svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.