ICC Women's T20 World Cup, Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची ही अंतिम फेरीत खेळण्याची सहावी वेळ आहे. त्यामुळे पहिल्याच अंतिम फेरीत बाजी मारून जेतेपद पटकावण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण, या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास कोण बाजी मारेल, जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल?
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. भारतीय महिलांनी गटातील चारही सामने जिंकून ८ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, तर दुसरीकडे इंग्लंडच्या खात्यात ब गटात ६ गुण होते. त्यामुळे गटातील अव्वल कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही पावसानं व्यत्यय आणला. पण, ऑस्ट्रेलियानं रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत कूच केली.
आज पाऊस पडला तर काय?उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात न आल्यानं गटातील सरस कामगिरी करणाऱ्या संघाला पुढे चाल देण्यात आली. पण, अंतिम फेरीच्या बाबतीत तसे होणार नाही. आयसीसीनं अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे आज पाऊस पडल्यास अंतिम सामना सोमवारी होईल आणि सोमवारीही पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून जाहीर केले जाईल.
हवामानाचा अंदाज काय?भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १२.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेलबर्नमध्या लख्ख सूर्यप्रकाश राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता फारच कमी आहे.