अखेरचा चेंडू... जिंकायला हव्या होत्या दोन धावा. एक धाव निघाली की सुपर ओव्हर होणार होती. भारताच्या गोलंदाजाच्या हाती चेंडू होता. या चेंडूवर किती धावा निघणार, याची चर्चा सुरु झाली. पण घडलं काही तरी वेगळंच. भारताच्या गोलंदाजाने विकेट मिळवली आणि संघाने अखेरच्या चेंडूवर थरारक विजय नोंदवला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच रंगला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय संघासाठी फारसा चांगला दिसत नव्हता. कारण भारताच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून सर्वाधिक धावा तळाची फलंदाज असलेल्या शिखा पांडेने केल्या. भारताकडून सर्वाधिक धावा झाल्या होत्या २४. वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताला २० षटकांमध्ये ८ फलंदाजांच्या मोबदल्यात १०७ धावाच करता आल्या होत्या.
आव्हान जरी लहान वाटत असले तरी ते वाचवण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारताने टिच्चून गोलंदाजी केली आणि सहाव्या षटकात पहिले यश मिळवले. त्यानंतर भारतीय गोलंदजांनी वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला वेसण घातले. भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा केला आणि अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजच्या संघाला दोन धावांची गरज होती.
अखेरच्या चेंडूवर नेमके काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. या चेंडूवर दोन धावा निघाल्या असत्या तर वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला असता. एक धाव निघाली असती तर सामना टाय झाला असता. भारताची गोलंदाज पुनम यादव हे षटक टाकत होती. दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरण होते. चाहतेही डोळ्यात पाणी घालून अखेरचा चेंडू पाहण्यासाठी आतूर झाले होते.
पुनम यादव अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाली. पुनमने हा चेंडू टाकला आणि वेस्ट इंडिजच्या फलंदाजानी तो भिरकावला. आता नेमके होणार तरी काय, हे कोणालाच कळत नव्हते. पण हा चेंडू भारताच्या वेद कृष्णमूर्तीच्या हातात जाऊन विसावला आणि भारताने थरारक विजयाची नोंद केली. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सराव सामना चांगलाच गाजला. पण अखेर भारताने वेस्ट इंडिजवर मात केली.