ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. शेफाली वर्माच्या फटकेबाजीनंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना संघाला विजय मिळवून दिला. भारतानं हा सामना 3 धावांनी जिंकला. भारतीय संघ आज चार फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला होता आणि ही रणनीती उपयोगी ठरली. न्यूझीलंडच्या अॅमेली केरनं अखेरच्या दोन षटकांत तुफान फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती.
LIVE UPDATES
सामन्यात रंगला थरारस्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या पूनम यादवनं टाकलेल्या 19व्या षटकात अॅमेली केरनं 18 धावा चोपून काढताना सामन्यात चुरस निर्माण केली. त्यात अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हायली जेन्सनला चौकार मिळाला. शिखा पांडेनं अचून मारा करताना न्यूझीलंडला 3 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. केरनं 19 धावांत नाबाद 34 धावा केल्या. न्यूझीलंडला 20 षटकांत 6 बाद 130 धावांवर समाधान मानावे लागले.
- अॅमेली केरनं 19व्या षटकात पूनम यादवच्या गोलंदाजीवर 18 धावा चोपून काढल्या. केरनं चार चौकार खेचले
- राधा यादवनं घातली मार्टीनला बाद करून भारताला मोठं यश मिळवून दिलं. मार्टीननं 25 धावा केल्या.
- कॅटी मार्टीन आणि मॅडी ग्रीन यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, राजेश्वरी गायकवाडने ही जोडी तोडली. तिनं ग्रीनला ( 24) बाद केले.
- लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 34 धावांत 3 धक्के बसले. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी पहिल्या दहा षटकांत किवींना हे धक्के दिले.
- 134 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला पहिला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के बसले. शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी किवींना धक्के दिले. सहा षटकांत किवींची अवस्था 2 बाद 30 अशी झाली होती.
-
- 14व्या षटकात न्यूझीलंडला मोठं यश मिळालं. त्यांनी टीम इंडियाच्या शेफाली वर्माला बाद केले. शेफालीनं 34 चेंडूंत 46 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
- भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राखला. अवघी एक धाव करून ती माघारी परतली.
- 12व्या षटकात रोझमेरी मेयरनं टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. तिनं जेमिमा रॉड्रीग्जला बाद केले. जेमिमाला 10 धावाच करता आल्या.
- त्याच षटकात शेफालीचा सोपा झेल ताहूहूनं सोडल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसण्यापासून वाचता आलं.
- 10व्या षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. अॅमेलिया केरनं पहिल्याच चेंडूवर तानिया भाटीयाला बाद केले. तानिया आणि शेफाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. तानियानं 23 धावा केल्या.
- भारतीय महिला संघानं सात षठकांत 50 धावा पूर्ण केल्या.
- शेफालीनं आपली फटकेबाजी सुरू ठेवताना किवी गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. तिनं अॅना पीटरसनच्या एका षटकात सलग दोन खणखणीत षटकार खेचून संघाला अर्धशतकी धावांकडे कूच करून दिली
- स्मृती मानधनानं चौकार खेचून धावांचे खाते उघडले खरे, परंतु तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचीत झाली. तिने केवळ 11 धावा केल्या
- स्मृती मानधनाचे पुनरागमन. तापामुळे मुकावे लागले होते दुसऱ्या लढतीत
- न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे
-२०१८ च्या वेस्ट इंडिजमध्ये खेळविण्यात आलेल्या विश्वचषकात भारताने या संघाचा ३४ धावांनी पराभव केला. हरमनप्रीतने त्या सामन्यात १०३ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडने श्रीलंकेचा ७ गडी राखून सहज पराभव केला. त्या सामन्यात कर्णधार सोफी डिव्हाईन हिने नाबाद ७५ धावा ठोकल्या होत्या
-भारताविरुद्ध न्यूझीलंडचा रेकॉर्डही चांगला आहे. दोन्ही संघात झालेले मागचे तिन्ही सामने त्यांनी जिंकले. वर्षभराआधी स्थानिक मालिकेत भारताचा त्यांनी ३-० असा पराभव केला होता.
- भारताने ऑस्ट्रेलियाचा १७, तर बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. पाच संघाचा समावेश असलेल्या अ गटात अव्वल स्थानी असलेल्या भारताचे दोन सामन्यात चार गुण आहेत. न्यूझीलंडला लोळविल्यास हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीकडे भक्कम वाटचाल करणार आहे.