ICC Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियन महिला संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्यांदा बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं अंतिम लढतीत भारतीय महिला संघावर ८५ धावांनी विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. पत्नी अॅलिसा हिलीला चिअर करण्यासाठी स्टार्कने हा खटाटोप केला होता. स्टार्कच्या या प्रेमावर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं एक विधान केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा सॉलिड 'पंच'; टीम इंडियाला नमवून रचला इतिहास
अॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियानं २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० असा पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला. अॅलिसा हिलीला सामन्यातील, तर बेथ मूनीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
हिलीला प्रत्यक्षात अंतिम फेरीत खेळताना पाहण्यासाठी स्टार्कने आफ्रिका दौरा अर्धवट सोडला होता. ऑस्ट्रेलियन संघ वन डे मालिकेसाठी आफ्रिका दौऱ्यावर होता. तीन वन डे मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणारा होता. पण, पत्नीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिअर करण्यासाठी स्टार्कने संघ व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी ती परवानगी दिलीही आणि स्टार्क त्वरित मेलबर्नसाठी रवाना झाला. त्याच्या उपस्थितीनं हिलीचे मनोबल उंचावले आणि तिनं मॅच विनिंग खेळी केली.
पण, यावरून टेनिसपटू सानियानं उपखंडातील लोकांना चिमटा काढला. ती म्हणाली,''असंच जर उपखंडातील कुणी केलं असतं, तर एका सेकंदात त्याला जोरू का गुलाम ठरवून सर्व मोकळे झाले असते. मिचेल तुझे कौतुक.''
तो आला, त्यानं पाहिलं अन् तिनं जिंकलं, पाहा Video
भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...
भारतीय महिला संघाचं नेमकं काय चुकलं?