ICC Women's Under-19 T20 World Cup Final : भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अन् नंतर फलंदाजीत कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळून भारतीय मुलींनी जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतलीच होती. त्यानंतर फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडली. श्वेताने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शेफालीनेही ७ सामन्यांत १७२ धावा केल्या. गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत.
शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या पोरींनी इंग्लंडची घसरगुंडी उडवली. तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची वाईट अवस्था केली. इंग्लंडचा संघ ६८ धावांत तंबूत परतला. संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला ( ०) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा ( १०) त्रिफळा उडवला. कर्णधार ग्रेस स्क्रीव्हन्सला ( ४) देवीने बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. संधूने सामन्यातील दुसरी विकेट घेताना सेरेन स्मेलची विकेट घेतली. त्यानंतर चोप्राने दोन धक्के दिले. गोंधळलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी विकेट फेकल्या. जॉसी ग्रोव्हेस ( ४) रन आऊट झाली. शेफालीने इंग्लंडला आठवा धक्का देताना हॅना बेकरला ( ०) माघारी पाठवले. मन्नत कश्यपने नववा धक्का देताना अॅलेक्सा स्टोनहाऊसची ( ११) विकेट घेतली. सोनम यादवने शेवटची विकेट घेतली. ICC स्पर्धेच्या फायनलमधील सर्वबाद ६८ ही सर्वात निचांक खेळी ठरली. यापूर्वी २००६मध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने ७१ धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही २० धावांत दोन धक्के बसले. कर्णधार शेफाली वर्मा १५ धावांवर, तर श्वेता सेहरावत ५ धावांवर बाद झाल्या. सौम्या तिवारी ( २४) आणि गोंगडी त्रिशा ( २४) या जोडीने भारताचा डाव सावरला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"