ICC Women's Under-19 T20 World Cup Final : भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अन् नंतर फलंदाजीत कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळून भारतीय मुलींनी जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतलीच होती. त्यानंतर फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडली. भारतीय महिलांनी पहिली वहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले अन् संघाला ५ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.
ICC स्पर्धेच्या फायनलमधील सर्वबाद ६८ ही सर्वात निचांक खेळी ठरली. यापूर्वी २००६मध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने ७१ धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही २० धावांत दोन धक्के बसले. कर्णधार शेफाली वर्मा १५ धावांवर, तर श्वेता सेहरावत ५ धावांवर बाद झाल्या. सौम्या तिवारी ( २४) आणि गोंगडी त्रिशा ( २४) या जोडीने भारताचा डाव सावरला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"