ICC Women's World Cup 2022: भारतीय महिला संघाला शनिवारी बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. भारताने विजयासाठी ठेवलेले २७८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स व ३ चेंडू राखून पार केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. पण, या पराभवामुळे मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची पुढील वाटचाल खडतर बनवली आहे. भारतीय संघाचा पाच सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला आहे आणि आता साखळी सामन्यात त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाकडे दोन संधी आहेत.
भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला नमवून धमाका केला. पण, त्यानंतर यजमान न्यूझीलंडकडून हार मानावी लागली. पण, बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून भारताची गाडी रुळावर आली असे वाटत असताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार मानावी लागली आहे. त्यामुळे आता भारताला उर्वरित दोन लढतींत फक्त विजय पुरेसा नाही. २२ तारखेला भारताचा बांगलादेशशी, तर २७ मार्चला दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. त्यामुळे त्यांना यजमान न्यूझीलंडपेक्षा नेट रन रेट चांगला ठेवावा लागणार आहे. न्यूझीलंडला उर्वरित लढतीत पाकिस्तान व गतविजेत्या इंग्लंडचा सामना करायचा आहे. या निकालावरही भारतीय महिला संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिका ४ पैकी ४ विजय व ८ गुणांसह दुसऱ्या आणि वेस्ट इंडिज ३ विजय व ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ ५ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट हा +०.४५६ इतका आहे. न्यूझीलंडच्या खात्यातही ४ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट -०.२१६ इतका आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारतासह न्यूझीलंड, इंग्लंड व बांगलादेश हे शर्यतीत आहेत. भारताला उर्वरित दोन सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल, तरच त्यांची उपांत्य फेरी पक्की होईल.