ख्राईस्टचर्च - आज झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ७१ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयात एलिसा हिलीची १७० धावांची खेळी निर्णायक ठरली. १३८ चेंडूंचा सामना कत २६ चौकारांच्या मदतीने एलिसा हिली हिने १७० धावांची केलेली खेळी ही अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली. तसेच कुठल्याही क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीत उभारलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
एलिसा हिली हिने १३८ चेंडूंमध्ये २६ चौकारांच्या मदतीने १७० धावा कुटल्या. दरम्यान, या खेळीबरोबर एलिसा हिली क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वैयक्तिक धावा फटकावणारी फलंदाज बनली आहे. तिने अॅडम गिलख्रिस्ट (१४९, २००७ विश्वचषक), रिकी पाँटिंग (१४०, २००३ विश्वचषक) आणि व्हिव रिचर्ड्स (१३८, १९७९ विश्वचषक) यांचा रेकॉर्ड मोडला. दरम्यान, एलिसा हिलीच्या या १७० धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३५६ धावा फटकावल्या. हा महिला विश्वचषकातील सर्वोच्च तर महिला आणि पुरुष विश्वचषकात मिळून दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. २००३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात २ बाद ३५९ धावा कुटल्या होत्या.
या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला सलामीवीर एलेसा हिली हिने सुरुवातीपासूनच आघाडीवर ठेवले. तिच्या १७० धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला निर्घारित ५० षटकांमध्ये ५ बाद ३५६ धावा जमवता आल्या. या खेळीत ४१ धावांवर असताना मिळालेले जीवदान तिच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. तिला रेचेल हेन्स ६८ आणि बेथ मुनी ६२ यांच्याकडून चांगली साठ मिळाली.
दरम्यान, ३५७ धावांचे आव्हान इंग्लंडसाठी अवाक्याबाहेरचे ठरले. इंग्लंडच्या फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्या. नताली सिवरने एक बाजू लावून धरत संघाचे आव्हान जिवंत ठेवले. मात्र तिला दुसरीकडून पुरेशी साथ मिळाली. नाही. अखेर इंग्लंडचा संपूर्ण संघ २८५ धावांत गारत झाला. महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ ३४ वर्षांनंतर आमने-सामने आले होते. त्यात अखेर ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.