ख्राईस्टचर्च - एलिसा हिलीने केलेली वादळी शतकी खेळी आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गोलंदाजांनी केलेल्या अचून माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा ७१ धावांनी पराभव केला आणि विक्रमी सातव्यांदा महिलांच्या विश्वचषकावर कब्जा केला. महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत एलिसा हिली हिने फटकावलेल्या १७० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८५ धावांत गारद झाला. इंग्लंडकडून नताली सिवरने एकाकी झुंज देताना १४८ धावा फटकावल्या.
या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला सलामीवीर एलेसा हिली हिने सुरुवातीपासूनच आघाडीवर ठेवले. तिच्या १७० धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला निर्घारित ५० षटकांमध्ये ५ बाद ३५६ धावा जमवता आल्या. या खेळीत ४१ धावांवर असताना मिळालेले जीवदान तिच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. तिला रेचेल हेन्स ६८ आणि बेथ मुनी ६२ यांच्याकडून चांगली साठ मिळाली.
दरम्यान, ३५७ धावांचे आव्हान इंग्लंडसाठी अवाक्याबाहेरचे ठरले. इंग्लंडच्या फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्या. नताली सिवरने एक बाजू लावून धरत संघाचे आव्हान जिवंत ठेवले. मात्र तिला दुसरीकडून पुरेशी साथ मिळाली. नाही. अखेर इंग्लंडचा संपूर्ण संघ २८५ धावांत गारत झाला. महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ ३४ वर्षांनंतर आमने-सामने आले होते. त्यात अखेर ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.