India knocked-out of the group stage in ICC Women's World Cup - मिताली राज आणि झुलन गोस्वामी या भारतीय महिला क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंच्या कारकीर्दीचा शेवट हा वर्ल्ड कप विजयाविना झाला. या दोघींची ही अखेरची वर्ल्ड कप स्पर्धा होती आणि भारतीय महिला संघ त्यांना जेतेपदाने निरोप देण्यासाठी सज्ज होत्या. पण, दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या नाट्यमय लढतीत भारताला आज पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे उपांत्य फेरीचे आव्हान संपुष्टात आले. दीप्ती शर्मा ( Deepti Sharma) कडून पडलेला NO-Ballने घात केला आणि आफ्रिकेने ३ विकेटने सामना जिंकला. भारतीय खेळाडू, चाहते यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुःख असताना वेस्ट इंडिजच्या महिलांनी भारताच्या पराभवाचे सैराट सेलिब्रेशन केले. सोशल मीडियावर तो व्हिडीओ चर्चिला जात आहे.
भारताला उपांत्य फेरीत राहण्यासाठी आजची लढत जिंकणे महत्त्वाचे होते. पण, सामन्यापूर्वीच भारताला धक्का बसला आणि संघातील अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी हिला दुखापतीमुळे बाकावर बसावे लागले. स्मृती मानधना ( ७१) व शेफाली वर्मा ( ५३) यांनी दमदार खेळी केली. कर्णधार मिताली राज ( ६८) व हरमनप्रीत कौर ( ४८) या दोघींनीही सुरेख खेळ केला, परंतु अखेरच्या १० षटकांत आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना भारताला ७ बाद २७४ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात लॉरा वोल्व्हार्ट ( ८०) व लारा गुडऑल ( ४९) यांनी आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार सून लूस ( २२) व मॅरिझॅन केप ( ३२) यांनीही चांगली साथ दिली. पण, मिगनन ड्यू प्रीझ ही अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभी राहिली आणि नाबाद ५२ धावांसह आफ्रिकेचा विजय पक्का केला.
शेवटच्या षटकात ७ धावांची आवश्यकता असताना दिप्ती शर्माने गोलंदाजीला सुरूवात केली. २ चेंडूत ३ धावांची आवश्यकता असताना ड्यू प्रीझने हवेत चेंडू मारला, हरमनप्रीतने झेलदेखील घेतला. पण दुर्दैवाने तो नो बॉल ठरवण्यात आला. त्यामुळे पुढील चेंडू फ्री हिट मिळाला. त्यानंतर पुढील २ चेंडूत २ धावा सहज काढत आफ्रिकेने सामना जिंकला. भारताच्या या पराभवामुळे वेस्ट इंडिज महिला संघाचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले.