ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पाच विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम लावला. पण तरीही पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियाने 146 धावांची सलमी दिली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया सहजपणे साडेतिनशे धावा करेल, असे वाटत होते. पण त्यानंतर आमीरने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना झटपट तंबूत धाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 49 षटकांतच गारद झाला आणि त्यांना 307 धावांवर समाधान मानावे लागले.
पाहा हा व्हिडीओ
मॅक्सवेलचा भन्नाट रनआऊट आणि पाकिस्तानचे टाय टाय फिश...ऑस्ट्रेलियाचा संघ किती व्यावसायिक आहे,हे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले. ग्लेन मॅक्सवेलने उडी मारून चेंडू पकडत थेट स्टम्पवर मारला. त्यावेळी सर्फराझ अहमद क्रिझबाहेर असल्यामुळे तो बाद झाला आणि पाकिस्तानचे आव्हान संपष्टात आले. या गोष्टीचा एक व्हिडीओ आयसीसीने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
हा पाहा खास व्हिडीओ
पाकिस्तानचे शेपूट वळवळले, पण पराभवाने होरपळले ऐनवेळी कच कशी खावी, याचा नमुना पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या 308 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. पण 2 बाद 136 वरून त्यांची 7 बाद 200 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचे शेपूट वळवळायला लागले. यावेळी पाकिस्तान सामना जिंकू शकेल, असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अखेर भेदक मारा करत संघाला 41 धावांनी विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या इमाम उल हक (53) बाबर आझम आणि मोहम्मद हफिझ यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण कर्णधार सर्फराझ अहमदचा अपवाद वगळता अन्य मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली. पण वहाब रियाझ (45) आणि हसन अली (32) या तळाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत संघाचे आव्हान कायम ठेवले होते. सर्फराझने जबाबदारी घेऊन खेळ न केल्याने पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला.
एकेकाळी ऑस्ट्रेलियाची बिनबाद 146 अशी भक्कम स्थिती होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांचा पल्ला सहज गाठेल, असे म्हटले जात होते. पण शतकवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना 307 धावांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाच बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच आणि वॉर्नर यांनी दमदार फलंदाजी करत 146 धावांची सलामी दिली. फिंच 82 धावांवर आऊट झाला, पण त्यानंतर वॉर्नरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शतक झळकावले. वॉर्नरने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 107 धावांची खेळी साकारली. वॉर्नरबाद झाला तेव्हा 37.5 षटकांत ऑस्ट्रेलियाची 4 बाद 242 अशी धावसंख्या होती. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना साडे तिनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही.