टाँटन : मागच्या सामन्यात बांगलादेशच्या फिरकीपटूंपुढे चाचपडणाऱ्या न्यूझीलंडला शनिवारी विश्वचषकात अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे सावध रहावे लागणार आहे. न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यात रॉस टेलरच्या धावांचा मोठा वाटा राहिला. लंकेला दहा गड्यांनी नमविल्यानंतर त्यांना बांगलादेशविरुद्ध, मात्र घाम गाळावा लागला होता. आशियाई संघांविरुद्ध खेळताना फिरकीला समर्थपणे तोंड दिले, तरच विजय शक्य असल्याची जाणीव टेलरला आहे.
तो म्हणाला,‘ अफगाण संघात अनेक चांगले फिरकी गोलंदाज असल्याने विजयी मोहीम कायम राखण्यासाठी फिरकीचे आव्हान पेलावे लागेल. न्यूझीलंडची गोलंदाजी वेगवान माºयावर विसंबून आहे. मॅट हेन्री याने दोन्ही सामन्यात मिळून सात गडी बाद केले असून ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन यांची त्याला चांगली साथ लाभली. कर्णधार केन विलियम्सन आणि टेलर हे फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत.अफगाण संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले. पण त्यांनी दिलेली झुंज अनेकांना आवडली. न्यूझीलंडविद्ध फिरकी गोलंदाज राशिद खान आणि मोहम्मद नबी यांची २० षटके निर्णायक ठरणार आहेत. नबीने लंकेविरुद्ध ३० धावात ४ गडी बाद केले होते.
अफगाणिस्तानची फलंदाजी मात्र चिंतेचा विषय आहे. मागच्या सामन्यात संघाला डकवर्थ- लुईस नियमानुसार विजयासाठी ४१ षटकात १८७ धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा डाव १५२ धावांत संपुष्टात आला. फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज असून मोठ्या भागीदारी कराव्या लागतील, यावर पराभवानंतर कर्णधार गलबदीन नायब याने भर दिला होता.
दोन्ही संघांदरम्यान विश्वचषक स्पर्धेमध्येच केवळ एक सामना झाला असून त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळविलेला आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वचषक जिंकता आलेला नाही. विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध १८६, तर न्यूझीलंडने १८८ धावा केल्या आहेत. हीच या दोन्ही संघांची सर्वाेच्च तसेच नीचांकी धावसंख्या आहे.