लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला 311 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांची मिशन वर्ल्डकपची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडला विजय मिळवता आला. या सामन्यात स्टोक्सच्या कामगिरीने 12 वर्षांपूर्वीच्या चमत्काराशी बरोबरी केली.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका सामन्यात अर्धशतक, दोन विकेट आणि दोन झेल टीपणारा स्टोक्स हा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी 2007च्या वर्ल्ड कपमध्ये केनियाचा स्टीव्ह टिकोलो ( 72*+2/34+2 झेल) वि. कॅनडा, 2003 मध्ये इंग्लंडचा अँण्ड्य्रू फ्लिंटॉफ (64 + 2/15 + 2 झेल) वि. भारत आणि 1996 मध्ये श्रीलंकेच्या अँटोनी डी'सिल्वा (107* + 3/42 + 2 झेल) वि. ऑस्ट्रेलिया यांनी अशी कामगिरी केली आहे.