Join us  

अजिंक्य रहाणे सांगतो 'हा' संघ वर्ल्ड कप जिंकणार, पण...

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या व्यासपीठाचा वापर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 1:26 PM

Open in App

मुंबई : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या व्यासपीठाचा वापर करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेही त्याला अपवाद नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी गेल्या वर्षभरात चांगलीच उंचावलेली आहे. त्यामुळे इंग्लंड व वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. रहाणेनेही भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल, असे मत व्यक्त केले आहे. 30 मे पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

वन डे क्रिकेटपासून रहाणे बराच काळ दूर असला तरी त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकाची कोंडी अजूनही कायम असल्याने रहाणेच्या नावाची चर्चा सुरू आहे. रहाणेही आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून वर्ल्ड कप संघात स्थान पटकावण्यासाठी सज्ज आहे. तो म्हणाला,''भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाची सध्याची कामगिरीच फार बोलकी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघ अशीच धमाकेदार कामगिरी करेल, परंतु आयसीसीच्या या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणेचे गरजेचे आहे. भारतासह न्यूझीलंडचा वन डे संघ मजबूत आहे आणि आयसीसीच्या स्पर्धेत त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. वेस्ट इंडिज संघाचा अंदाज बांधणे अवघड आहे, परंतु तो आणि इंग्लंडचा संघ घातकी ठरू शकतात. इंग्लंडमध्ये त्यांच्याचविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल.''  आजी-माजी खेळाडूंनी भारत आणि इंग्लंड या दोन संघांनी वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार म्हणून निवड केली आहे. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर यजमान इंग्लंडने 21पैकी 14 मालिका जिंकल्या आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावलेला आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या मालिकेत भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. 

भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेआयसीसीवर्ल्ड कप 2019