लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलेले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना अखेरच्या साखळी फेरीत बांगलादेशवर मोठ्या फरकाने ( अशक्यप्राय) विजय मिळवावा लागणार आहे. न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध 119 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांचे 9 सामन्यांत 11 गुण आहेत, पण मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतरही त्यांचा नेट रन रेट पाकिस्तानच्या तुलनेत (+0.175) सरस आहे तर पाकिस्तानचा नेट रन रेट (-0.792) आहे. त्यामुळे पाकिस्तानला केवळ विजय पुरेसा नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर जोक्सचा धुमाकूळ माजला आहे. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा व इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.
पाकिस्तानलाही अशाच चमत्काराची गरज आहे.पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत किमान 350 धावा कराव्या लागतील. तसेच 350 धावा केल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला लागेल.
दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल.
तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
पण, जर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यास, एकही चेंडू न खेळता पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकला जाईल.यावरून आकाश चोप्रानं पाकिस्तानची फिरकी घेतली. त्यानं लिहिले की,''लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर आज 500-575 धावा होण्याची शक्यता आहे, परंतु वाईट बातमी ही की या धावा दोन्ही संघांच्या मिळून होतील. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणारा संघ 280-285 धावा करू शकतो.''