लंडन : पाचवेळचा जग्गजेता ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात शनिवारी अफगाणिस्तानविरुदध करणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या कामगिरीकडे असणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही स्टार फलंदाजांवर चेंडू कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संघात आल्यानंतर हे दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये वॉर्नरने सर्वाधिक ६९२ धावा केल्या, तर स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावले.
ऑस्ट्रेलियासाठी मागील वर्ष अनेक चढ-उताराचे राहिले. मात्र अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली संघाने उभारी घेतली असून विश्वचषक स्पर्धेत त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नर व स्मिथ यांना सन्मानपूर्वक स्थान दिले असले तरी त्यांना इंग्लंडमध्ये प्रेक्षकांच्या हुर्योला सामोेरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स व मिशेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांसह जेसन बेहरेनडोर्फ , नाथन कूल्टर नाईल व केन रिचर्डसन असतील. अॅडम झम्पा व नॅथन लियोन यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे फिरकीला चांगले पर्याय आहेत. सराव सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
अफगाणिस्तानची ही दुसरी विश्वचषक स्पर्धा आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्यांनी कर्णधार बदलला आहे. असगर अफगाणऐवजी गुलबदन नायब याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. यामुळे संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज झाले. मात्र आता त्यांनी स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. निवड समिती प्रमुख दौलत खान अहमदजइ म्हणाले, ‘गुलबदनने असगर याच्या अनुभवाचा वापर केला जाईल असे सांगितले आहे. संघ आता एकजूट आहे.’
Web Title: ICC World Cup 2019: All eyes on Smith, Warner; Australia - Afghanistan face today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.