मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचे 15 शिलेदार वन-डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीने दोन दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या संघनिवडीवर अनेकांनी आपापली सकारात्मक व नकारात्मक अशी मतं मांडली. भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही या संघाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. अंबाती रायुडूला वगळण्यावर त्याने तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली.
निवड समितीने लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्याचा निर्णय घेत रायुडू व रिषभ पंतला बाहेर बसवले. गंभीर म्हणाला,''रिषभ पंतला वगळण्याबाबत कोणताच वाद नाही, परंतु अंबाती रायुडूचे नाव नसण्याचे दुःख झाले आहे. वन डे क्रिकेटमध्ये 48ची सरासरी असलेल्या खेळाडूला वर्ल्ड कप संघांतून बाहेर ठेवणे दुर्दैवी आहे. त्याची निवड न होणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का आहे.'' 2011च्या वर्ल्ड कप विजयात गंभीरचा फार मोठा वाटा होता. त्याने 9 सामन्यांत 393 धावा चोपल्या आणि त्यात अंतिम सामन्यातील 97 धावांची उल्लेखनीय खेळीचाही समावेश आहे. 2007च्या वन डे वर्ल्ड कप संघातून वगळल्याचा अनुभव सांगताना त्याने रायुडूच्या आताच्या स्थितीशी तुलना केली. तो म्हणाला,''2007च्या वर्ल्ड कप निवडीतून मला वगळण्यात आले होते आणि आज रायुडूवर तो प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे त्याचे दुःख मी समजू शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे इतर खेळाडूंपेक्षा मला रायुडूबद्दल अधिक दुःख वाटत आहे.''
आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार, अंबाती रायुडूची खरमरीत टीकासंघात निवड झाल्यानंतर काही वेळ रायुडू हा शांत होता. पण मंगळवारी दुपारी त्याने ट्विटरच्या माध्यमातून निवड समितीवर टीका केली आहे. टीका करताना रायुडू म्हणाला की, " आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार आहे." ही टीका करताना रायुडूला सांगायाचे आहे की, विश्वचषकातील संघात माझी निवड केली नाही. पण मी विश्वचषकात खेळतो आहे, हा आभास निर्माण करण्यासाठी मी आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार असल्याचे रायुडूने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.